![]() |
| Pregnant Cattle Care in Summer |
शेतकरी बंधूंनो नमस्कार,
शेती हा जरी आपला प्रमुख व्यवसाय असला तरी देखील शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण सर्वजण पशुपालन देखील पारंपारिक पद्धतीने करत आलो आहोत.
शेतकरी बंधूंना आपल्याकडील हवामानात उन्हाळा हा ऋतू पशुपालकांसाठी दिवसेंदिवस मोठे आव्हान वाटत आहे.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे जनावरांवर उष्णतेचा ताण येतो. विशेषतः गाभण जनावरांसाठी हा काळ अधिक संवेदनशील असतो. योग्य काळजी घेतली नाही तर जनावरांची तब्येत बिघडू शकते तसेच गर्भाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे उन्हाळ्यात गाभण जनावरांचे योग्य संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे.
गाभण जनावरांचे योग्य संगोपनाचे महत्त्व,
गाभण जनावरांच्या पोटात वाढणारा गर्भ निरोगी राहण्यासाठी आई जनावराची तब्येत चांगली असणे आवश्यक असते.
योग्य आहार, पाणी आणि आराम मिळाल्यास वासरू सुदृढ , सशक्त जन्माला येते.
जर जनावराला उष्णतेचा जास्त त्रास झाला तर दूध उत्पादन कमी होते , भूक न लागणे किंवा गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.
उन्हाळ्यात गाभण जनावरांवर होणारे परिणाम
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे
जनावरांची भूक कमी होते.
पाणी पिण्याचे प्रमाण वाढते.
थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
दूध उत्पादनावर परिणाम होतो.
यामुळे गाभण जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
उष्णतेमुळे गर्भावर होणारे परिणाम
उन्हाळ्यातील जास्त तापमानामुळे गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊन,काही वेळा गर्भाची वाढ मंदावते किंवा वासरू कमजोर जन्माला येते.
म्हणून जनावरांना थंड वातावरण, पुरेसा आहार आणि पाणी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जनावरांच्या गोठ्याचे व्यवस्थापन.
उन्हाळ्यात गोठा थंड आणि हवेशीर असणे आवश्यक आहे.
गोठ्याचे छप्पर उंच असावे.
हवेसाठी खिडक्या किंवा जाळ्या असाव्यात.
गोठ्याभोवती झाडे लावल्यास सावली मिळते.
शक्य असल्यास पंखे किंवा पाण्याचे फवारे वापरावेत
यामुळे जनावरांना उष्णतेपासून आराम मिळतो.
स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था.
उन्हाळ्यात जनावरांना जास्त पाणी लागते. गाभण जनावरांना दिवसातून अनेक वेळा स्वच्छ व थंड पाणी द्यावे. पाण्याची टाकी किंवा भांडी रोज स्वच्छ ठेवावीत. पाण्याची कमतरता असल्यास जनावरांवर उष्णतेचा ताण वाढू शकतो.
संतुलित व पौष्टिक आहार.
नेहमी गाभण जनावरांना संतुलित आहार देणे खूप गरजेचे आहे.
आहारात खालील गोष्टींचा समावेश असावा:
हिरवा चारा,
कोरडा चारा,
कडबा,
दाणेदार खाद्य,
दर्जेदार कॉलिटी चा खुराक.
संतुलित आहारामुळे जनावरांची ताकद टिकून राहते आणि गर्भाची वाढ चांगली होण्यास मदत होते.
हिरवा व कोरडा चारा यांचे योग्य प्रमाण
गाभण जनावरांच्या आहारात हिरवा चारा असणे आवश्यक आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये पोषक तत्वे भरपूर असतात.
कोरडा चारा पचनासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे दोन्ही प्रकारचा चारा योग्य प्रमाणात द्यावा.
खनिज मिश्रण व जीवनसत्त्वे
गाभण जनावरांना या काळात खनिज मिश्रण देणे खूप गरजेचे असते. कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे गर्भाच्या वाढीसाठी उपयुक्त असतात.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार खनिज मिश्रण आणि जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात द्यावीत.
उष्णतेपासून संरक्षण
उन्हाळ्यात जनावरांना थेट उन्हात बांधून ठेवू नये.
गोठ्यात सावली असावी.
दिवसातील जास्त उष्णतेच्या वेळी जनावरांना विश्रांती द्यावी
शक्य असल्यास जनावरांवर पाण्याचा हलका शिडकावा करावा.
यामुळे शरीराचे तापमान कमी राहते.
नियमित आंघोळ व स्वच्छता
उन्हाळ्यात गाभण जनावरांना दिवसातून एकदा तरी स्वच्छ पाण्याने धुवून काढावे त्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होते.
गोठा स्वच्छ ठेवणे हेही तितकेच आवश्यक आहे. स्वच्छतेमुळे रोगांचा धोका कमी होतो.
माशा व कीटकांपासून संरक्षण
उन्हाळ्यात माशा, डास आणि इतर कीटकांचा त्रास वाढतो. त्यामुळे
गोठा स्वच्छ ठेवावा.
कीटकनाशक फवारणी करावी.
जनावरांवर औषधयुक्त द्रावण वापरावे.
यामुळे जनावरांना चांगल्या प्रकारे आराम मिळतो.
पशुवैद्यकीय तपासणी
गाभण जनावरांची वेळोवेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण आणि औषधे दिल्यास जनावरांची तब्येत चांगली राहते.
प्रसूतीपूर्व काळजी
प्रसूती चे दिवस जवळ आल्यावर जनावरांना शांत आणि स्वच्छ जागा द्यावी.
पुरेसा आहार व पाणी मिळेल याची काळजी घ्यावी. कोणतीही समस्या दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा.
शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
जनावरांना नेहमी सावलीत ठेवावे.
पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध असाव.
नियमित संतुलित आहार द्यावा.
गोठा स्वच्छ ठेवावा.
दरम्यानच्या काळात वेळोवेळी पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.
उन्हाळ्यात गाभण जनावरांची योग्य काळजी घेतल्यास जनावरांची तब्येत चांगली राहते.
आणि निरोगी वासरू जन्माला येते.
योग्य आहार, स्वच्छ पाणी, सावली आणि नियमित तपासणी या गोष्टींचे व्यवस्थित पालन केल्यास शेतकऱ्यांना चांगल्या वासरा सोबतच दूध व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो.
Tags
पशुपालन
