![]() |
| Solar Panel Cleaning Guide: |
शेतकरी बंधूंनो दिवसेंदिवस वाढत्या वीजदरामुळे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या गरजेमुळे सोलर ऊर्जा (Solar Energy) हा सर्वात प्रभावी पर्याय ठरत आहे.
घरांमध्ये, शेतात, उद्योगांमध्ये तसेच सरकारी संस्थांमध्ये सोलर पॅनलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु अनेकदा सोलर पॅनल बसवल्यानंतर त्याची योग्य देखभाल आणि स्वच्छता करणे गरजेचे असते.
सोलर पॅनलवर धूळ, माती, पक्ष्यांची विष्ठा, पानांचा कचरा किंवा प्रदूषण जमा झाल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते आणि वीज उत्पादन घटते.
सोलर क्षेत्रातील तज्ञांच्या मते, जर सोलर पॅनल नियमितपणे स्वच्छ ठेवले तर त्याची कार्यक्षमता (वीजनिर्मिती क्षमता) 15 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
म्हणूनच आज आपण,
सोलर पॅनल स्वच्छतेचे महत्त्व, योग्य पद्धत, आवश्यक साधने आणि स्वच्छता करताना घ्यावयाची काळजी
याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सोलर पॅनलवर घाण साचण्याची प्रमुख कारणे.
सोलर पॅनल सहसा घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत बसवले जातात. त्यामुळे त्यावर नैसर्गिकरीत्या धूळ आणि इतर घाण साचते .
धूळ आणि माती – ग्रामीण भागात किंवा शेतीजवळ पॅनल असल्यास धूळ पटकन साचते.
पक्ष्यांची विष्ठा – छतावर बसलेल्या पक्ष्यांमुळे पॅनलवर डाग पडतात.
पानांचा कचरा – झाडांच्या जवळ पॅनल असल्यास पानांचा थर बसतो.
हवेमधील प्रदूषण – शहरांमध्ये धूर आणि प्रदूषणामुळे पॅनलवर थर तयार होतो.
पावसाचे पाणी – काही वेळा पावसामुळे मातीचे डाग तयार होतात.
या सर्व कारणांमुळे पॅनलवर सूर्यप्रकाश कमी प्रमाणात पोहोचतो आणि त्यामुळे वीज उत्पादन कमी होते.
सोलर पॅनल स्वच्छ केल्याने होणारे फायदे
सोलर पॅनलची नियमित स्वच्छता केल्यास,
1. वीज उत्पादन वाढते
पॅनलवर सूर्यप्रकाश थेट पडल्यामुळे ऊर्जा उत्पादन अधिक होते.
2. पॅनलचे आयुष्य वाढते
घाण आणि धूळ काढल्यामुळे पॅनलची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकते.
3. देखभाल खर्च कमी होतो
नियमित स्वच्छता केल्यास मोठ्या दुरुस्तीची गरज कमी पडते.
4. गुंतवणुकीचा जास्त फायदा मिळतो
सोलर सिस्टमवर केलेली गुंतवणूक जास्त काळ फायदेशीर ठरते.
सोलर पॅनल स्वच्छता करण्यासाठी योग्य वेळ.
तज्ञांच्या मते पुढील वेळ सर्वात योग्य मानली जाते:
सकाळी लवकर (6 ते 8 वाजेपर्यंत)
संध्याकाळी सूर्यास्तानंतर
दुपारी पॅनल खूप गरम असतात. अशावेळी पाणी टाकल्यास काचेला तडा जाण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या वेळी स्वच्छता करूच नये.
सोलर पॅनल स्वच्छ करण्यासाठी लागणारी साधने.
सोलर पॅनल साफ करण्यासाठी साधी आणि सुरक्षित
साधने वापरणे आवश्यक आहे.
मऊ कापड किंवा स्पंज
लांब दांडा असलेला मॉप
स्वच्छ पाणी
प्लास्टिकची बादली
मऊ ब्रश
रबर स्क्वीजी (पाणी काढण्यासाठी)
रासायनिक डिटर्जंट किंवा कडक ब्रश वापरणे आठवणीने टाळावे.
सोलर पॅनल स्वच्छ करण्याची योग्य पद्धत.
सोलर पॅनल साफ करण्यासाठी पुढील पद्धत वापरावी.
1. सोलर सिस्टम बंद करा
सर्वप्रथम इन्व्हर्टर आणि वीज पुरवठा बंद करावा.
2. पॅनलवर पाणी टाका
हलके पाणी टाकून धूळ आणि माती मऊ करावी.
3. मऊ स्पंजने स्वच्छ करा
पॅनलवर हलक्या हाताने स्पंज किंवा मॉप फिरवावा.
4. पक्ष्यांच्या डागांवर विशेष लक्ष द्या
जिथे जास्त डाग आहेत तेथे हळूवार स्वच्छता करावी.
5. पॅनल स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.
6. पाणी सुकू द्यावेत.
पॅनल नैसर्गिकरित्या सुकू द्या.
सोलर पॅनल स्वच्छता करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी.
1. सुरक्षिततेची काळजी घ्या
छतावर काम करताना घसरणार नाही याची काळजी घ्या.
2. केमिकल चा वापर टाळा .
डिटर्जंट किंवा आम्लयुक्त पदार्थ पॅनलला नुकसान करू शकतात.
3. कडक ब्रश वापरू नका
यामुळे पॅनलच्या काचेवर ओरखडे पडू शकतात.
4. वायरिंगला स्पर्श करू नका
विद्युत धक्का बसण्याचा धोका असतो.
5. पॅनलवर उभे राहू नका
यामुळे पॅनल तुटण्याची शक्यता असते.
सोलर पॅनल स्वच्छ करताना टाळावयाच्या चुका.
बऱ्याच वेळा लोक अनवधानाने काही चुका करतात.
गरम पॅनलवर थंड पाणी टाकणे.
केमिकल वापरणे.
पॅनलवर जास्त दाब देऊन साफ करणे.
पॅनलवर चढून साफ करणे.
पाण्याचा जास्त प्रेशर वापरणे.
या चुका टाळल्यास पॅनल सुरक्षित राहतात.
किती दिवसांनी सोलर पॅनल स्वच्छ करावेत.?
सोलर पॅनल किती दिवसांनी स्वच्छ करावेत हे परिसरावर अवलंबून असते.
ग्रामीण भागात – दर 15 ते 20 दिवसांनी
शहरी भागात – दर महिन्याला
धूळ जास्त असलेल्या भागात – दर 10 दिवसांनी
नियमित स्वच्छता केल्यास पॅनलची कार्यक्षमता टिकून राहते.
पावसामुळे सोलर पॅनल स्वच्छ होतात का?
अनेकांना वाटते की पावसामुळे पॅनल पूर्णपणे स्वच्छ होतात. परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही.
पावसामुळे वरची धूळ थोडी कमी होते, परंतु चिकट घाण आणि पक्ष्यांचे डाग तसेच राहतात. त्यामुळे पावसावर अवलंबून राहणे तितकेसे योग्य नाही.
सोलर पॅनलची नियमित देखभाल कशी करावी.
सोलर पॅनलची कार्यक्षमता टिकवण्यासाठी ..
पॅनलची नियमित तपासणी करणे.
वायरिंग आणि कनेक्शन तपासणे.
झाडांच्या सावलीपासून पॅनल दूर ठेवणे.
वरचेवर इन्व्हर्टरची स्थिती तपासणे.
पॅनलवर तडे किंवा नुकसान आहे का ते पाहणे.
शेतकरी आणि घरांसाठी सोलर पॅनलचे महत्त्व
सोलर ऊर्जा आजच्या काळात शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
सोलर पॅनल मुळे वीज बिलाचा खर्च कमी होतो.
सोलर पंपाद्वारे सिंचन करता येते.
दिवसभर मोफत वीज मिळते.
पर्यावरणाचे संरक्षण होते.
घरांसाठी फायदे.
सोलर पॅनल मुळे वीज बिल कमी होते.
लोडशेडिंगचा त्रास कमी होतो.
स्वच्छ , नियमित ऊर्जा मिळते.
एकंदरीतच बारकाईने विचार केला तर,
सोलर पॅनल ही दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक गुंतवणूक आहे. परंतु त्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी नियमित देखभाल आणि स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.
सोलर क्षेत्रातील तज्ञांच्या मते, जर सोलर पॅनल वेळोवेळी स्वच्छ केले तर त्याची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते आणि वीज उत्पादन जास्त मिळते. तसेच पॅनलचे आयुष्य देखील वाढते.
म्हणूनच सोलर पॅनल बसविल्यानंतर त्याची योग्य काळजी घेऊन योग्य देखभाल केल्यास सोलर ऊर्जा आपल्यासाठी दीर्घकाळ स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक अक्षय ऊर्जा स्रोत ठरू शकते.
Tags
कृषी सल्ला
