कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. मात्र, अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे या पिकावर 'करपा' (Purple Blotch) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या सर्वात मोठे आव्हान म्हणजे 'करपा' हा रोग. बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या पातीवर पडणारा हा रोग पिकाचे अतोनात नुकसान करतो.
करपा रोगामुळे कांद्याची गुणवत्ता आणि उत्पादन या दोन्हीवर याचा विपरीत परिणाम होतो. वेळेत लक्ष न दिल्यास हा रोग संपूर्ण शेत फस्त करू शकतो.
कांदा पिकावरील "करपा रोग"
करपा हा प्रामुख्याने 'अल्टरनेरिया पोरी' (Alternaria porri) नावाच्या बुरशीमुळे होणारा रोग आहे. याला इंग्रजीत 'पर्पल ब्लॉच' असेही म्हणतात. ही बुरशी कांद्याच्या पातीवर हल्ला करते आणि हळूहळू ती संपूर्ण झाडाला ग्रासते.
करपा रोगाची लक्षणे
- कांद्याच्या पातीवर सुरुवातीला लहान, पांढरट-राखाडी रंगाचे ठिपके दिसतात.
- हे ठिपके वाढत जाऊन लंबगोलाकार होतात आणि त्यांचा मध्यभाग जांभळ्या किंवा तांबूस रंगाचा होतो.
- ठिपक्यांच्या कडा पिवळसर रंगाच्या दिसतात.
- अनेक ठिपके एकत्र आल्यामुळे संपूर्ण पात पिवळी पडून वाळू लागते.
- जास्त प्रादुर्भाव झाल्यास मान कुजते आणि कांदा सडू लागतो.
करपा रोग होण्याची कारणे
- रोगट बियाणे किंवा रोपांचा वापर करणे.(बीज प्रक्रियेचा अभाव)
- जमिनीत ओलावा जास्त असणे आणि निचरा न होणे.
- नत्रयुक्त खतांचा (उदा. युरिया) गरजेपेक्षा जास्त वापर करणे.
- मागील हंगामातील रोगट अवशेषांची विल्हेवाट न लावणे.
करपा रोग वाढीस पोषक हवामान
- ढगाळ हवामान आणि सततचा पाऊस.
- हवेतील ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता.
- २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान.
- रात्री पडणारे धुके आणि सकाळी पानावर साठलेले दव.
करपा रोगामुळे होणारे नुकसान
- पाती वाळल्यामुळे झाडाची प्रकाशसंश्लेषण क्रिया थांबते, परिणामी कांद्याची फुगवण होत नाही.
- कांद्याचा आकार लहान राहतो आणि उत्पादनात २५ ते ५० टक्क्यांपर्यंत घट येते.
- कांद्याची साठवणूक क्षमता कमी होते, ज्यामुळे साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण वाढते.
करपा रोगास प्रतिबंधात्मक उपाययोजना
- बीजप्रक्रिया: पेरणीपूर्वी बियाण्याला ३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन प्रति किलो याप्रमाणे प्रक्रिया करावी.
- पीक पालट: एकाच जमिनीत वारंवार कांदा घेऊ नये; पिकाची फेरपालट करावी.
- लागवडीचे अंतर: दोन ओळींत आणि दोन रोपांत योग्य अंतर ठेवावे जेणेकरून हवा खेळती राहील.
- पाणी व्यवस्थापन: पाणी देताना साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा.
करपा रोगाची जैविक नियंत्रण पद्धती
- ट्रायकोडर्मा विरिडी: १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे.
- फवारणी: ५ मिली 'स्यूडोमोनास फ्लुरोसन्स' प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास रोगाचा प्रसार रोखता येतो.
- सेंद्रिय खतांचा वापर वाढवून जमिनीचा पोत सुधारावा.
करपा रोगाचे रासायनिक नियंत्रण (फवारणी उपाय)
रोगाची लक्षणे दिसताच खालीलपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी (प्रमाण १० लिटर पाण्यासाठी):
- मॅन्कोझेब (७५% WP): २५ ग्रॅम
- कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब: २० ग्रॅम
- टेब्युकोनॅझोल: १० मिली
- अॅझोक्सीस्ट्रोबिन: १० मिली
(फवारणी करताना स्टिकरचा वापर अवश्य करावा, कारण कांद्याची पात गुळगुळीत असते त्यामुळे फवारलेले औषध त्यावरती चिटकून राहत नाही.)
करपा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ रासायनिक फवारणीवर अवलंबून न राहता, प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे गरजेचे आहे.
हवामानाचा अंदाज घेऊन आणि पिकाचे रोज निरीक्षण करून वेळेत उपचार केल्यास नुकसान टाळता येते. नेहमी प्रमाणित बियाणे वापरा. पेरणी पूर्वी बियाण्याला बीजपक्रिया करावी .
वरील सांगितल्याप्रमाणे उपाययोजना केल्यास करपा रोगावर नियंत्रणच काय त्याचा कायमचा बीमोड देखील करू शकतो.
Tags
कीड & रोग व्यवस्थापन
